*छायाचित्र आंजावरून साभार
दी बॉय इन दी स्ट्राईप्ड पजामास हे
आयरीश लेखक जॉन बोयन ह्यांचे २००६ साली आलेले दुसर्या महायुद्धाची पार्श्वभुमी असलेले पुस्तक आहे.
९ वर्षीय ब्रुनो एकदा दुपारी शाळेतून घरी येतो तेव्हा पाहतो मरिया त्यांची घरकाम करणारी बाई त्यांच्या सामानाची बांधाबांध करत आहे. त्यांने
त्याच्या आईला विचारले की त्याच्या सामानाची बांधाबांध का होत आहे ह्यावर आई म्हणाले की फक्त तोच नव्हे तर त्याची बहिण ग्रेटेल आणि आई-बाबाही बर्लिनसोडून दुसर्या गावी जाणार आहेत. ब्रुनोच्या
वडिलांना काही महत्वाच्या सरकारी कामासाठी त्या गावी जाऊन रहावं लागणार होतं. ब्रुनोला
खूप वाईट वाटले, आपली शाळा
सोडावी लागणार, आपले खास
मित्र कार्ल, डॅनियल आणि
मार्टिन, त्यांची
पुन्हा भेट केव्हा होईल काहीच माहित नाही, आई म्हणाली नव्या गावी नवे मित्र मिळतील, त्यांच्याशी
मैत्री होईल पण ब्रुनो पार गोंधळून गेला होता, त्याला मुळातच बर्लिन सोडून जायचे नव्हते.
ब्रुनोला हा बदल अजिबात आवडला नव्हता , नव्या घरी
आल्यावर तो काहिसा उदास, कंटाळलेला,
एकटा राहू लागला. कुणी खेळायला नव्हतं. दिवसभर तो
खिडकीबाहेर बघत बसे. बाहेर त्याला अनेक शिपाई व काही विचित्र टक्कल केलेली लोकं दिसे, त्यांनी
पट्ट्या-पट्ट्यांचा पायजमा परिधान केलेला असे.
ब्रुनोला आठवले जेव्हा बर्लिनमधे होतो तेव्हा अधून-मधून एकटेच भटकायला जायचो अगदी कोपरा नं कोपरा आपल्या माहित होता तिथला पण इथे आल्यापासून आपण असे काहीच केले नाही, नवी जागा,
आजू-बाजूची ठिकाणं काहीच पाहिले नाही. त्याने तडक
उठून कपाटातून आपला ओव्हरकोट आणि बुट काढले व बाहेर पडला. आजू-बाजूला रान होतं , ब्रुनो त्या
रानातून फिरत असताना त्याला एका ठिकाणी तारेचे कुंपण असलेली जागा दिसली. नीट निरखून पाहिले तर तारेच्या कुंपणापलिकडे एक त्याच्याच वयाचा टक्कल केलेला , पट्ट्या-पट्ट्यांचा पायजमा घातलेला मुलगा दिसला. तो मुलगा
कुंपणापलिकडे बसला होता.
ब्रुनो त्याच्या जवळ गेला व त्याच्याशी बोलू लागला, त्याचे नाव
श्मुएल होतं. शिडशिडीत
अंगकाठीचा, खाली मान
घालून जमीनीकडे एकटक बघत बसलेला, पांढुरक्या
रंगाचा होता. पायात मोजे
नव्हते, तळपाय मातीने खराब झालेले होते. त्याच्या
दंडावर चांदणी असलेला बँड होता. त्याच्या
नजरेत वेगळीच उदासीनता होती. ब्रुनो कुंपणाअलिकडे मांडी घालून बसला व श्मुएलशी गप्पा मारू लागला, त्याला खरं
तर श्मुएलच्या उदासीनतेचे कारण विचारयचे होते पण तसे न करता तो त्याच्याशी गप्पा मारू लागला. गप्पा मारता
मारता ब्रुनोला समजले की श्मुएल हा पोलंडचा आहे, त्याची व
ब्रुनोची जन्मतारीख ही एकच आहे. श्मुएलची
आई श्मुएलच्या शाळेत शिक्षिका होती व तिने श्मुएलला जर्मन भाषा शिकवली होती.
श्मुएल ब्रुनोला सांगू लागला ह्या कॅम्पमध्ये येण्यापुर्वी तो त्याच्या आई-वडिल आणि भावासोबत राहत असे. त्याच्या
वडिलांचे घड्याळ्यांचे दुकान होते. एक दिवस
तिथल्या सैनिकांनी श्मुएलच्या परिवाराला पकडून क्राकोवला डांबून ठेवले आणि मग तिथून त्यांना एका ट्रेनमध्ये कोंबून आणले, ती ट्रेन
अगदी थंड, कुबट वासाची व खचाखच गर्दीने भरली होती , अगदी गुदमरल्या सारखे झाले होते. श्मुएलच्या
आईला दुसरीकडे कुठेतरी ठेवले होते, त्यांची
ताटातुट झाली होती. श्मुएल,
त्याचे वडिल व भाऊ ह्यांना ह्या कॉन्संट्रेशन कॅम्पमध्ये आणले गेले.
श्मुएलसारखीच अनेक मुलं, पुरुष तिथे
बंदिस्त होते. श्मुएलला
त्याचे वडिल त्या कॅम्पमध्ये नेमके कुठे आहेत माहित नव्हते आणि तो त्यांना शोधू पाहतोय. ब्रुनोला
आजूनही उलगडा होत नव्हता की त्या कॅम्पमध्ये नेमकं काय होतं श्मुएलही त्याला फारसे काही सांगू शकत नव्हता.
पुढिल संपुर्ण पुस्तक हे ब्रुनो व श्मुएलची मैत्री ज्याबद्दल ब्रुनो कधीच कुणाशी बोलला नव्हता, त्यांच्यातले
संभाषण ह्यावर आहे. पुढे ते
दोघे कसे श्मुएलच्या वडिलांचा शोध घेण्याचे ठरवतात, त्यात त्यांना यश मिळतं की नाही की वेगळेच काही पुढे वाढून ठेवले आहे हे सगळे वाचण्यासारखे आहे. वाचताना
आपण नकळत त्या दोघांच्या विश्वात सामील होतो. कथा जशी
जशी पुढे सरकते तसे तसे मन उदास होतं, गलबलून जातं.
सुन्न करणारे असे पुस्तक आहे हे , थोडेसे हार्ट-ब्रेकिंग.
२००८ साली मार्क हर्मन दिग्दर्शित ह्याच नावाचा सिनेमा देखील आला होता, जरुर वाचा
आणि चित्रपट बघा.
*छायाचित्र आंजावरून साभार
No comments:
Post a Comment